नाशिक। दि. ४ सप्टेंबर २०२६: अवैध सावकारीतून तब्बल ४८ लाख रुपये व्याज वसूल केल्यानंतरही आणखी ५० लाख रुपयांची मागणी करत मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडील प्लॉट बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सद्दाम शेख आणि लता बर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमृतधाम परिसरात राहणारे मेडिकल व्यावसायिक विजय शिरोडे यांनी संशयित सद्दाम शेख याच्याकडून २० लाख रुपये उसने घेतले होते. २०२१ पासून आतापर्यंत या रकमेपोटी शिरोडे यांनी तब्बल ४८ लाख रुपये व्याज दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, मुद्दल आणि व्याजाची रक्कम अद्याप बाकी असल्याचे सांगत शेख आणि लता बर्डे यांनी त्यांच्याकडे आणखी ५० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
या पैशांच्या व्यवहारातून शिरोडे यांना पंचवटीतील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. तेथे त्यांना कारमध्ये घालून मारहाण करण्यात आली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
चार तास कार्यालयात डांबून ठेवले:
यानंतर शिरोडे यांचे कारमधून अपहरण करून त्यांना अमृतधाम येथील गोल्डस्टार कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे सुमारे चार तास डांबून ठेवत शिरोडे तसेच त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
धमकीच्या दबावाखाली शिरोडे यांच्या नावावरील प्लॉटचा डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट जबरदस्तीने करून घेतल्याचा आणि त्यानंतर प्लॉटवर ताबा मिळवल्याचा आरोप संशयितांवर आहे.
‘अॅट्रॉसिटी’च्या गुन्ह्याची धमकी:
दरम्यान, लता बर्डे हिने मध्यस्थी करत प्लॉट सद्दाम शेखच्या नावावर करून न दिल्यास शिरोडे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी सद्दाम शेख आणि लता बर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच आडगाव पोलिस ठाण्यात प्लॉट बळकावून ताबा सोडण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून याच संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
![]()


