नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन सायबर टोळीने आत्तापर्यंत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलेला आहे. असे असताना आता शहरातील खुटवडनगर परिसरातील दोघांनी शहरातील १८ जणांना असेच आमिष दाखवून तब्बल ७७ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
गेल्याच आठवड्यात म्हसरुळ हद्दीमध्ये दोघा संशयितांनी हॉटेलमध्ये सेमीनार घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखों रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ताजी असतानाच, अंबड पोलीस ठाण्यातही दोघांविरोधात अशाचरितीने फसवणूक केल्याची तक्रार शहर आर्थिक गुन्हेशाखेने दाखल केली आहे.
मधुकर कोळी, तेजस मधुकर कोळी (रा. रोहाऊस, कार्तिकेय नगर, खुटवडनगर, कामटवाडा शिवार) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. प्रकाश मारुती पवार (रा. श्री संकुल सोसायटी, पांडवनगरी, कामटवाडे शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, मार्च २०२२ मध्ये संशयितांनी शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास त्यावर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते.
संशयितांनी पवार यांचा विश्वास संपादन केल्याने त्यांनीही गुंतवणूक केली. त्यावर त्यांना चांगला परतावा संशयितांनी मिळवून दिला. या माध्यमातून संशयितांनी आणखी काही गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमधील गुंतवणूकीवर मिळत असलेला परतावा दाखवून त्यांचाही विश्वास संपादन केला. त्यामुळे परिसरातील सुमारे १८ जणांनी संशयितांकडे आर्थिक गुंतवणूक केली. संशयिताने त्यावर सुरवातीला चांगला परतावाही दिला. परंतु नंतर परतावा मिळणे बंद झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांना विचारणा केली असता, संशयितांनी काहीतरी कारणे सांगून वेळ मारून नेली.
परंतु नंतरही परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी संशयितांचे घर गाठले असता, ते पसार झाल्याचे आढळून आले. फिर्यादीसह १८ जणांची ७६ लाख ८५ हजार ५२० रुपयांची फसवणूक झाली आहे.सदरचा प्रकार मार्च २०२२ ते जून २०२३ या दरम्यान घडला.
याप्रकरणी पवार यांच्यासह १८ गुंतवणूकदारांनी अंबड पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाकामी तो शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग झाला आहे. गुन्ह्याचा तपास उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहेत. घरूनच व्यवहारसंशयित कोळी यांचे कार्तिकेयनगरमध्ये रो हाऊस आहे.
येथूनच ते शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करायचे. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडल्यानंतर त्यांनी गुंतवणूकदारांच्या त्यांच्या गुंतवणुकीनुसार दरमहा ८ ते १० हजार रुपये परतावा दिला. त्यामुळे आणखी गुंतवणूकदार आले. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच संशयितांनी परतावा देणे बंद केले आणि काही दिवसातच ते रातोरात पसार झाले आहेत.