महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर सलग ४१ तास खुले; तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद

नाशिक, दि. १४ फेब्रुवारी २०२६: महाशिवरात्री उत्सवानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी सलग ४१ तास खुले ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने जाहीर केला आहे. संभाव्य गर्दीचा विचार करून दि. १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या व्हीआयपी दर्शनसेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दर्शन व्यवस्थेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजल्यापासून सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी अखंड खुले राहील. मुख्य धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजावरील दर्शनबारी येथून २४ तास सुरू राहणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शन पूर्णपणे बंद असेल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गर्भगृहात प्रवेश देण्यात येणार नाही. स्थानिक त्र्यंबकवासीयांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, पहाटे ४ ते सकाळी १० आणि सायंकाळी ६ ते दि. १६ फेब्रुवारी सकाळी १० वाजेपर्यंत त्यांना पश्चिम दरवाजातून प्रवेश दिला जाईल. ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक राहील. स्थानिकांव्यतिरिक्त इतर कोणालाही या प्रवेशद्वारातून प्रवेश मिळणार नाही, असे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

दरम्यान, दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार ऐनवेळी नियोजनात बदल करण्याचे अधिकार देवस्थान ट्रस्टने राखून ठेवले आहेत. भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्षा न्या. श्रीमती पी. व्ही. घुले व विश्वस्त मंडळाने केले आहे.

धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा:
महाशिवरात्रीच्या रात्री ११ वाजता विशेष महापूजा होणार असून त्यानंतर मंदिर प्रांगणात देवाची पालखी मिरवणूक काढण्यात येईल. सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मंदिरातून मुख्य मार्गाने कुशावर्त तीर्थ येथे पालखी नेण्यात येईल. तेथे पूजा व आरतीनंतर पालखी पुन्हा मंदिरात परत येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

सांस्कृतिक उत्सव:
दि. १४ फेब्रुवारी: गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्या गीतरामायणाचा कार्यक्रम गायक श्रीधर फडके सायंकाळी ७ वाजता सादर करतील.
दि. १५ फेब्रुवारी दुपारी ४ वाजता अघोर नृत्याचे सादरीकरण.
दि. १६ फेब्रुवारी : सायंकाळी ६ वाजता शास्त्रीय कथ्थक नृत्याचा कार्यक्रम.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790