नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून आर्टिस्ट तरुणीवर लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या विवाहित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की तिला नृत्याची आवड असल्याने तिने आपले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. रील बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट करण्याचा तिला छंद होता.
पीडित तरुणीला विनोद कुमावत याच्या इन्स्टाग्राम आयडीवरून “माझ्या अल्बममध्ये काम करणार का?” अशी विचारणा झाल्यानंतर तिने तयारी दर्शविली. नंतर दोघांचे मोबाईलवर बोलणे होऊन विनोद ऊर्फ सचिन तिला भेटायला तिच्या राहत्या घरी गेला.
त्यावेळी माझी विनोद कुमावत नावाची कंपनी असून, मी गाणी बनविण्याचे काम करतो. त्यासाठी मी सुंदर चेहऱ्याच्या शोधात असून, यापूर्वीही अनेक सुंदर मुलींना मी काम दिलेले आहे. याबाबत तुम्ही माझ्या अकाऊंटवर खात्री करू शकता, पीडित तरुणीला खात्री झाल्याने तिने होकार दिला. दरम्यान, वारंवार भेटी होत असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. त्याने तिला लग्नाची मागणीही घातली. घरच्यांच्या संमतीनंतर पीडितेने त्याला होकार दिला.
दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी गाण्याचे शूट संपल्यानंतर विनोद तिला सोडण्यासाठी घरी आला असता घरी कोणी नसल्याची संधी साधत तो तिच्याशी अंगलट करू लागला. त्याला विरोध करूनही त्याने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला; मात्र तो लग्न करणार असल्याने तिने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.
नंतरही त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. नंतर तिने लग्नाबाबत त्याला विचारणा केली तेव्हा त्याने तिला काही दिवस थांबण्यास सांगितले. दरम्यान, विनोद हा विवाहित असून, त्याला एक मुलगाही असल्याची धक्कादायक माहिती तिला मिळाली.
याबाबत तिने त्याला विचारले, तेव्हा त्याने पीडितेला शिवीगाळ व मारहाणही केली. काही दिवसांनंतर त्याने पीडितेची समजूत काढून “मी पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार असून, याबाबतची केस कोर्टात सुरू आहे. मी तुझ्याशीच लग्न करणार आहे,” असा विश्वास त्याने तिला दिला. जुलै 2023 मध्ये पीडितेने आपल्या घरच्यांची भेट विनोदशी घालून दिली. तेव्हा त्याने पीडितेशी लग्न करणार असल्याचे तिच्या पालकांना सांगितले.
एक दिवस तो त्याच्या राहत्या घरी तिला घेऊन जात त्याच्या घरच्यांशीही त्याने ओळख करून दिली. तेव्हा त्याच्या आईने तिला तेथेच राहण्याचा आग्रह केला. त्या दिवशी रात्री विनोदने तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. मधल्या काळात पीडितेच्या वडिलांनी विनोदच्या आईला लग्नाबाबत विचारले असता तिने दोन लाख रुपये हुंडा, पाच तोळ्यांची सोन्याची चेन व अंगठीची मागणी केली. आर्थिक परिस्थिती नसल्याने तिच्या वडिलांनी नकार दर्शविला.
काही काळानंतर विनोदने तिला फोन करणे, अल्बममध्ये काम देणे बंद केले. तिने वेळोवेळी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंत त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. दि. 17 जानेवारी रोजी त्याने सोशल मीडियावर तिला ब्लॉकही केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत (रा. रुम ११३, म्हाडा कॉलनी, सातपूर, नाशिक.) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ६८/२०२४) पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हांडोरे करीत आहेत.