
नाशिक। दि. ३० जून २०२५: जुन्या भांडणाचा राग मनात धरून अंबडच्या स्वामीनगर भागात शनिवारी (दि. २८) दोघांनी दुचाकीस्वार प्रशांत भदाणे (२५) या युवकावर कोयत्याने हल्ला चढवून ठार मारल्याची घटना घडली होती. दरम्यान, दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत (दि. ३) पोलिस कोठडी सुनावली.
याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी सुफियान अनिस अत्तार (१८, रा. स्वामीनगर), विक्की बंटी प्रसाद (२०, रा. कामटवाडे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी (दि. २८ जून) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास प्रशांत भदाणे हा युवक दुचाकीने जात होता. याचवेळी संशयित आरोपी सुफियान व विक्की यांनी दुचाकीने येत त्याला अडविले. मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला चढविला.
प्रशांत हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे बघून घटनास्थळावरून हे दोघेही फरार झाले होते. अंबड पोलिस ठाण्यासह चुंचाळे पोलिस चौकीचे पोलिस कर्मचारी व गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने तपासचक्रे फिरवून संशयिताना ताब्यात घेत अटक केली.