नाशिक। दि. २९ जून २०२५: अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंबड येथील लक्ष्मीनगर भागात प्रशांत सुभाष भदाणे (वय २६, रा. अंबड) या युवकावर शनिवारी (दि.२८जून २०२५) रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास कोयत्याने हल्ला करून टोळक्याने खून केल्याची घटना घडली.
प्रशांत याला लक्ष्मीनगर भागात चार ते पाचजणांच्या टोळक्याने घेरले. शिवीगाळ व मारहाण करत त्याच्यावर कोयत्याने सपासप वापर करत त्याचा खून केला. प्रशांत हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे बघून टोळक्याने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांसह चुंचाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चुंचाळे एमआयडीसी पोलिस चौकीच्या गुन्हे शोध पथकाने या हल्ल्याप्रकरणी एका युवकाला ताब्यात घेतले असल्याचे समजते.
तसेच अंबड पोलिसांनीही एका संशयिताला उशिरा ताब्यात घेतल्याचे समजते. या खुनातील संशयितांपैकी तिघांची नावे निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भदाणे याचा मृतदेह पोलिसांनी तातडीने घटनास्थळाहून शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविला. यानंतर जिल्हा रुग्णालयातसुद्धा गर्दी वाढली होती. फरार संशयित हल्लेखोरांचा रात्री उशिरापर्यंत तीन पथकांकडून शोध घेतला जात होता.