
नाशिक (प्रतिनिधी): मागील महिन्यात संत कबीरनगर येथे अरुण राम बंडी यांच्या खुनातील संशयित करण उमेश चौरे (वय १७, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी) याची सोमवारी (२८ एप्रिल) भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. कामटवाडे येथील स्मशानभूमीसमोर पाच ते सहा हल्लेखोरांनी करणवर दगड व फरशीच्या तुकड्यांनी हल्ला चढवून त्याचा जीव घेतला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
८ मार्च रोजी मध्यरात्री संत कबीरनगरात अरुण बंडी याचा टोळक्याने खून केला होता. या प्रकरणात करणवर संशय घेत त्याला ताब्यात घेण्यात आले होते. अल्पवयीन असल्याने त्याची बाल निरीक्षणगृहात रवानगी झाली होती, मात्र १९ एप्रिल रोजी त्याला जामिनावर मुक्तता मिळाली होती.
जामिनावर सुटल्यानंतर करणला त्याचा भाऊ आकाश याने शहर सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र, करणने हा सल्ला न ऐकता कामटवाडे सिडको परिसरातील मित्राकडे राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, संशयितांनी करणचा मागोवा घेत अखेर त्याचा काटा काढला.
सोमवारी दुपारी सुमारास करण कामटवाडे स्मशानभूमी रोडवरून जात असताना हल्लेखोरांनी त्याला घेरून बेदम मारहाण केली. डोक्यात दगड व फरशीचे तुकडे मारून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. गंभीर जखमी करण घटनास्थळीच मृत्युमुखी पडला. हल्लेखोरांनी हत्येनंतर घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ आणि युनिट-२च्या पथकांनी तपास सुरू केला.
याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि विशाल काठे यांना गुप्त माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी हे गंगापूर येथील आसाराम बापू पूल येथे थांबले आहेत. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर रवाना झाले. यावेळी पोलिसांची गाडी बघून संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
संशयित १) मोहन ज्ञानेश्वर वायचळे, वय १८ वर्षे ०६ महिने, रा. कामगार नगर, तिरंगा चौक, सातपुर, नाशिक, २) राहुल राजु गडदे, वय २० वर्षे, रा. आनंदवल्ली, रिक्षा स्टॅड जवळ, नाशिक मुळ रा. नांदुर कोंडार, ता. नांदगाव जि. नाशिक ३) साहिल पिंटु जाधव, वय २१ वर्षे रा. आनंदवली, माळी वाडा, गंगापुर रोड, नाशिक व इतर दोन विधीसंघर्षीत बालक असे एकूण पाच आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी सराईत गुन्हेगार संशयित हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली. संशयित आरोपींना पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क.१ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, नाझीमखान पठाण, योगीराज गायकवाड, रोहिदास लिलके, पोलीस नाईक विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, अमोल कोष्टी, राम बर्डे, महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे, चालक हवालदार सुकाम पवार, समाधान पवार यांनी केली आहे.