नाशिक: दरोडेखोरांची टोळी जेरबंद; वॉचमनला धमकावून केली जबरी चोरी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): उपनगर हद्दीतील खांडरे मळ्यात बंगल्याच्या वॉचमनला चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करीत दरोडा टाकणाऱ्या पाच दरोडेखोरांच्या टोळीला उपनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. संशयित टोळीकडून चारचाकी कारसह दरोड्याचे हत्यारे व जबरी चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात जबरी चोरीसह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेले संशयित विशीतील आहेत.

करण दयादास सोनवाणी (२०, रा. मंगलमूर्ती नगर, नारायणबापूनगर, जेलरोड), वैभव बाबाजी पाटेकर (२०, रा. नर्मदा सोसायटी, लोखंडेमळा, नारायण बापूनगर), पुष्कर गुलाब उन्हवणे (२०, रा. टाकळी रोड, खर्जुळ मळा), धीरजकुमार नरेश प्रसाद (२०, रा. टाकळी रोड, खर्जुळ मळा), राहुल अनुप कुमार (२०, रा. टाकळी रोड, खर्जुळ मळा) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

वॉचमन पाचुराम रामतीरथ अरजन उर्फ आकाश (रा. खांडरे मळा, नाशिक-पुणे रोड) याच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. २५) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास आकाश हा कुलदीप लोकवाणी यांच्या बंगल्याच्या बांधकामाच्या ठिकाणी वॉचमन असताना, ६ ते ७ अज्ञात संशयित त्याठिकाणी आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून तेथील लोकवानी, अमोल सातपुते, दिनेश खांडरे यांच्या बंगल्यातील तीन बोअरिंग मोटार, राजू मोरे यांया घरातील लिफ्ट फिटींगचे साहित्य असा १ लाख १० हजारांचे साहित्य जबरीने चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हेशोध पथकाचे जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पथके उपनगर हद्दीमध्ये शुक्रवारी (ता. २६) रात्री गस्त करीत असताना, पोतदार स्कुलच्या मागे काठेनगर येथे होंडा सिटी कारमध्ये (एमएच ०३ एडब्ल्यु १६२१) काही संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलीस वाहन त्याठिकाणी गेले असता संशयितांनी कार सोडून पळ काढला.त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून पाच संशयितांना पकडले तर एक संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

कारमधून लोखंडी चाकू, मिरची पुड, नायलॉन दोरी, हातोडी, स्क्रुड्रायव्हर यासह चोरी केलेल्या दोन बोअरवेल जलपरी मोटार जप्त करण्यात आल्या.सदरची कामगिरी उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत शिरसाठ, सहायक निरीक्षक सचिन चौधरी, उपनिरीक्षक विशाल सपकाळे, सुरेश गवळी, विनोद लखन, इम्रान शेक, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, पंकज कर्पे, सुरज गवळी, सुनील गायकवाड, सौरभ लोंढे आदींनी बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790