
नाशिक | १६ मे २०२५: कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सात गोवंश जनावरांची सुटका करत गुंडाविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. नाशिकरोड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरफाटाच्या आवारात ही धडक कारवाई करण्यात आली.
दिनांक १५ मे रोजी गुंडाविरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, सिन्नरफाट्याहून गोवंश जातीच्या गायी अवैधरित्या कत्तलीसाठी नेण्यात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ व पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, भुषण सोनवणे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड आणि कल्पेश जाधव यांच्या पथकाने बाजार समितीच्या परिसरात सापळा रचला.
थोड्याच वेळात बोलेरो पिकअप (क्रमांक MH 05 R 6111) ही संशयास्पद गाडी बाजार समितीच्या पडीत जागेत थांबलेली आढळली. त्वरित छापा टाकत पोलिसांनी गाडी आणि चालक प्रकाश वसंत गवळी (वय ३५, रा. सिन्नरफाटा, नाशिकरोड) याला ताब्यात घेतले. गाडीच्या आत चार आणि गाडीच्या जवळील जागेत तीन, अशा एकूण सात गोवंश जातीची जिवंत जनावरे सापडली.
पोलिस चौकशीत उघड झाले की, ही जनावरे गोपीनाथ रतन सोनवणे (वय ४८, रा. सिन्नरफाटा, नाशिक) याच्याकडे होती आणि तो मुस्तगीन हरून कुरेशी (रा. वडाळागाव, नाशिक) यांच्या सांगण्यावरून जनावरांची देखभाल करत होता. सदर जनावरे वडाळागाव येथे कत्तलीसाठी नेण्याची तयारी सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५.३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल, ज्यामध्ये जनावरे आणि वाहन यांचा समावेश आहे, जप्त केला असून दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, भुषण सोनवणे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.