
नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ मार्च रोजी नट्याभाईच्या मृत्यूचा बदला म्हणून रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला चढवून जिवे मारण्याच्या उद्देशाने वार करून गंभीररीत्या जखमी केले होते. या गुन्ह्यात दोन महिन्यांपासून फरार असलेला संशयित आरोपी मयूर अशोक तांबे (२८, रा. मोरवाडी) यास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने वडाळागावातून शिताफीने अटक केली.
रिक्षाचालक फिर्यादी हे १४ मार्च रोजी रिक्षाने घरी जात होते. पाथर्डी गावाच्या शिवारात ओळखीचे संशयित आरोपी स्वप्निल सोनकांबळे व अन्य साथीदारांनी रिक्षाचालकाला थांबवून मागील भांडणाची कुरापत काढून बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने वार करून गंभीररीत्या जखमी केले होते.
रिक्षावरही कोयता मारून नुकसान करत बळजबरीने ४ हजार रुपये काढून घेत पळ काढला होता. या गुन्ह्यात मयूर हा फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता; मात्र तो गुंगारा देण्यास यशस्वी होत होता. काही दिवसांपूर्वी त्याने परराज्यात पलायन केले. अंमलदार मनोहर शिंदे, तेजस मते यांना मयूर हा वडाळागावात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांना याबाबत कळविले.
पोलिस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, बाळू शेळके, शिंदे, बोडके यांचे पथक तयार करून वडाळागावातील अण्णा भाऊ साठे नगर भागात साध्या वेशात सापळा रचला. तेथे मयूर येताच त्याला शिताफीने जाळ्यात घेत वाहनात डांबले. त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.