
नाशिक। दि. ९ नोव्हेंबर २०२५: बेथेलनगर परिसरात ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या गोळीबार आणि दहशत माजविण्याच्या प्रकरणातील फरार संशयित आरोपी लंबोदर विष्णु फसाळे (वय १८) याला अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने धोंडेगावच्या जंगलातून नाट्यमयरित्या अटक केली.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून प्रभावी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
दहशत माजविण्याची घटना:
३ नोव्हेंबर रोजी रात्री बेथेलनगर येथे सात–आठ अनोळखी इसमांनी हातात कोयते, चॉपर, दांडके घेऊन रिक्षा, मोटारसायकलींच्या काचा फोडल्या तसेच घरांवर काचेच्या बाटल्या फेकून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले.
स्थानिक रहिवासी मायकल भंडारी यांनी ते कोण आहेत अशी विचारणा केली असता, आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. भंडारी जीव वाचवण्यासाठी पळत असताना आरोपींनी “हर्षद बाहेर ये, तुझा गेम करतो” अशी आरडाओरड केली आणि त्याचवेळी बंदुकीचा आवाज झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील संशयित लंबोदर फसाळे हा गुन्ह्यानंतर पसार झाला होता.
गुप्त माहिती, जंगलात सापळा आणि अटक:
अंबड गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना फसाळे हा धोंडेगाव जंगल परिसरातील नदीकाठी लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ८ नोव्हेंबर रोजी पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला आणि दुपारी २ वाजता फसाळेला शिताफीने ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षिरसागर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारूदत्त निकम व महिला पोलीस अंमलदार सविता कदम, नेमणूक अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे.
![]()


