
नाशिक। दि. ०५ जुलै २०२५: इंदिरानगर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोधक पथकाने वडाळा गावातील सादिक नगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा टाकून सहा संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे २०० किलो गोवंश जातीचे मांस, सात दुचाकी, दोन चारचाकी वाहने आणि सुमारे १६ लाख रुपये मूल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शोधक पथकाचे सदस्य सौरभ माळी यांना मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा गावातील सादिक नगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल केली जात असून मृत जनावरांचे मांस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांद्वारे वाहून नेले जात होते. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना ही माहिती दिली.
यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक संतोष फुंदे, पवन परदेशी, सौरभ माळी, सागर कोळी, अमोल कोथमिरे, जय लाल राठोड, सागर परदेशी, दीपक शिंदे, योगेश जाधव, जावेद खान, बंटी सय्यद, किशोर खरोटे, हार पाडे आणि तळपदे यांचा समावेश असलेली विशेष टीम बनवून दुपारी एक वाजता छापा टाकला. त्यात संशयित: नासिर कय्युम शेख (कसाईवाडा, वडाळा नाका), अब्दुल रहीम कुरेशी (कसाईवाडा, वडाळा नाका), सईद माजिद कुरेशी (नागसेन नगर, वडाळा नाका), हुसेन अफरोज कुरेशी (बागवानपुरा), अफरोज बिस्मिल्ला कुरेशी (बागवानपुरा) आणि रहीम अब्दुल्ला कुरेशी (श्रमिकनगर, गंजमाळ) असे पाच संशयित आढळले.
हे आरोपी अवैधरीत्या गोवंश जातीच्या पशुंची कत्तल करीत आणि मांसाचे तुकडे वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्याकडून सुमारे २०० किलो गोवंश जातीचे मांस, सात दुचाकी, दोन चारचाकी वाहने तसेच सुमारे १६ लाख रुपये मूल्याचा अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.