नाशिक। दि. ३ डिसेंबर २०२५: सातपूर परिसरातील समतानगर भागात बंद घरात सप्टेंबरमध्ये घरफोडी करून सुमारे १६ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून फरार झालेला सराईत गुन्हेगार संशयित परबतसिंग सिकलीकर (३७, रा. नंदुरबार) यास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या.
सातपूरमध्ये झालेल्या या घरफोडीप्रकरणी गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-२चे पथक करत होते. संशयित आरोपी निष्पन्न केल्यानंतर त्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू असताना हवालदार मनोहर शिंदे यांना सिकलीकरबाबतची गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सहायक उपनिरीक्षक संजय सानप यांचे पथक सज्ज करत नंदुरबारला रवाना झाले.
पथकाने साध्या वेशात सिकलीकर याच्याबाबत माहिती काढली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचून शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्यास नाशिक येथे आणून कसून चौकशी केली असता त्याने सातपूरमधील दोन व उपनगरमधील एक अशा तीन गुन्ह्यांची कबुली दिली. दोन दुचाकी त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या आहेत. त्यास पुढील तपासाकरिता सातपूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने घटनास्थळी भेट दिल्यानंतर आरोपी निष्पन्न करण्यासाठी तेथून आजूबाजूला असलेल्या परिसरात सुमारे ८० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. दुचाकीवरून येत संशयित आरोपींनी घरफोडी केल्याचा धागा मिळाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज, मानवी कौशल्याधारे सिकलीकर याची ओळख पटविली. त्याच्याविरुद्ध नंदुरबारसह अन्य जिल्ह्यांत घरफोडी, चोरी, जबरी चोरी, हाणामारीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
![]()


