
नाशिक (प्रतिनिधी): दरोडा, बेकायदेशीर जमाव जमविणे अशा विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेला मोस्ट वॉन्टेड सराईत गुन्हेगार तडीपार संशयित वेदांत संजय चाळगे (२०, रा. राहुलनगर, तिडके कॉलनी) यास क्राईम ब्रांच युनिट-१ च्या पथकाने शिताफीने कॉलेज रोडवर जाळ्यात घेतले.
क्राईम ब्रांच युनिट १ चे अंमलदार प्रशांत मरकड यांना माहिती मिळाल्यानंतर पथकाने कॉलेजरोड येथे सापळा रचला. यावेळी वेदांत हा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उभा असल्याचे लक्षात येताच पथकाने त्यास घेराव घालण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करत डॉन बॉस्को शाळेच्या संरक्षक भिंतीच्या आतमध्ये त्याने उडी घेतली.
यानंतर पुन्हा तो संरक्षक भिंतीच्या दुसऱ्या बाजूने बाहेर उडी घेत सूरज संकुल नावाच्या संकुलमध्ये जाऊन लपून बसला. येथे पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेत बेड्या ठोकून शासकीय वाहनात डांबले. हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, हवालदार: प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, योगीराज गायकवाड, विशाल काठे, नाझीम पठाण, प्रविण वाघमारे, पोलीस नाईक विशाल देवरे, समाधान पवार अनुजा येलवे यांच्या पथकाने केली.