नाशिक (प्रतिनिधी): पंधरा लाखांच्या खंडणीसाठी पिस्तूलचा धाक दाखवून अंबड भागातील एका व्यावसायिकाला अवैध सावकार कुंडलवाल पिता-पुत्रांनी धमकावल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी कैलास कुंडलवाल, रोहित कुंडलवाल व निखिल कुंडलवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्यावसायिकांकडून तीन लाखांवर अवाजवी व्याज आकारून दहा लाखांची रक्कम वसूल करूनही १५ लाखांची खंडणीची मागणी केली होती.
फिर्यादीचे केवल पार्क येथे फॅब्रिकेशनचे दुकान कोरोनामुळे बंद पडला होता. त्यावेळी जुलै २०१९ साली रोहित कुंडलवाल याला फोन करून पैशांची गरज असल्याचे फिर्यादींनी सांगितले होते. त्यावेळी कुंडलवाल याला तीन लाख रुपयांची गरज होती. तेव्हा फिर्यादीला पाच टक्के व्याजाने १५ हजार रुपये दरमहा पाच तारखेला द्यावे लागतील, असे सांगितले; मात्र व्याजाचे पैसे ऑनलाइन पद्धतीने न देता रोख स्वरूपात द्यायचे, अशी अट घातली. तसेच कुंडलवाल याने फिर्यादीकडून कोऱ्या स्टॅम्प पेपरवर बळजबरीने स्वाक्षऱ्या करून घेतल्या. तसेच त्यांच्या पत्नीच्या आधार कार्ड व पॅनकार्डसारख्या कागदपत्रांच्या सत्यप्रतीदेखील स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे.
कुंडलवाल पिता-पुत्रांविरूद्ध दररोज एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलेल्या आवाहनानंतर विविध उपनगरांमधून पिडित तक्रारदार समोर येऊ लागले आहेत. भद्रकाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रोहितच्या मुसक्या आवळल्या. कैलास व निखिल हे पितापुत्र फरार झाले आहेत. त्यांच्या मागावर पोलिस असून त्यांनाही ताब्यात घेण्यास यश येईल, असा पोलिसांचा दावा आहे. गंगापूर, पंचवटी, अंबड अशा तीन पोलिस ठाण्यांत यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
केवल पार्क येथील खान बंगल्याजवळ फॅब्रिकेशन शॉपवर पांढऱ्या रंगाच्या कारमधून कुंडलवाल पिता-पुत्र आले व तीन लाख रुपये व व्याजाचे दोन लाख रुपये, अशी एकूण पाच लाख रुपयांची मागणी करून आरोपी रोहित याने त्याच्याजवळील पिस्तूल काढून त्यांच्या दिशेने रोखून धाक दाखविला. तसेच फिर्यादीच्या पत्नीचा विनयभंग केला व तिला शॉपमध्ये डांबून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २१५/२०२५)