नाशिक (प्रतिनिधी): शहरात गेल्या पाच दिवसांपासून सीएनजीचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, त्यामुळे वाहनचालकांचे हाल सुरू आहेत. सीएनजी पंप असोसिएशनने वितरकांकडून होणाऱ्या पुरवठ्यातील विसंगतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
मंगळवारी (दि. १५) केवळ २० टक्केच पुरवठा झाल्याने अनेक पंपांवर दीड ते दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, काही भागांमध्ये वाहतूककोंडीही निर्माण झाली.
जिल्ह्यात सध्या सुमारे ५० सीएनजी पंप असून, त्यापैकी १० ते १२ पंप नाशिक शहरात आहेत. दररोज सरासरी ७०० ते ८०० किलो सीएनजीचा पुरवठा होतो; मात्र सध्या प्रत्येक पंपाला केवळ ४०० किलो सीएनजी पुरवठा केला जात आहे.
सामान्यतः शहरात २०० टँकरद्वारे सीएनजीचा पुरवठा केला जातो, पण मागील दोन दिवसांपासून केवळ २० टँकरच उपलब्ध होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून, त्यांची मोठी गैरसोय होत आहे.