नाशिक (प्रतिनिधी): नाशिक भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. हा अपघात दिंडोरीरोडवरील जकातनाका भागात झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तोबा दगडू म्हस्के (रा.म्हसोबावाडी दिंडोरीरोड) असे मृत वृध्दाचे नाव आहे. म्हस्के मंगळवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास परिसरातील जकातनाका भागात फेरफटका मारण्यासाठी गेले असता हा अपघात झाला. दिंडोरीरोडने ते पायी जात असतांना दिंडोरीकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणा-या एएच १५ केबी २५०३ या दुचाकीने त्यांना धडक दिली.
या अपघातात त्यांच्या डोक्यास व मांडीस गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार अपघातानंतर पसार झाला असून याबाबत मुलगा विनोद म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी अपधाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक योगेश परदेशी करीत आहेत.