नाशिक (प्रतिनिधी): भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी कंटनेर चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात नाशिक पुणा मार्गावरील शिंदे गावाजवळ झाला. ढाब्यावरील जेवण आटोपून चालक आपल्या वाहनाच्या दिशेने पायी जात असतांना त्यास कारने धडक दिली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय पाल सिंग (२४ रा.संधूरोड लाईन्स कंपनी चाकण,पुणे) असे मृत कंटेनर चालकाचे नाव आहे. अजय सिंग आयशर कंपनीचे कंटेनरचे ट्रॉली घेण्यासाठी गुजरात राज्यात गेले होते. लवप्रितसिंग,यादवीर सिंग व मख्खन सिग या चालकांसमवेत दोन कंटेनर घेवून अजयसिंग पुणे येथे जाण्यासाठी परतीचा प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.
नाशिक पुणे रोडवरील शिंदे टोलनाक्याच्या पुढील आप्पाचा ढाबा समोर रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करून चौघे चालक जेवणासाठी ढाब्यावर गेले होते. जेवण आटोपून रस्ता ओलाडून सर्व चालक आपल्या वाहनाच्या दिशेने पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०४ एलएच ३०९० या एक्सयुव्ही कारने अजयपाल सिंग यास जोरदार धडक दिली.
या अपघातात त्यास गंभीर दुखापत झाल्याने अन्य चालकांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत हवालदार संतोष पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी पसार झालेल्या कारचालका विरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार संतोष पाटील करीत आहेत. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५३२/२०२४)