नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): देवळाली कॅम्प-वडनेर मार्गावर गुरुवारी (दि.२१) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लष्करी हद्दीतून दुचाकीने प्रवास करताना सहायक पोलिस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा वाहनावरील ताबा सुटला.
यावेळी त्यांची दुचाकी थेट लष्कराच्या ट्रकला धडकली. यामध्ये सोनोने हे जबर जखमी झाले. त्यांना देवळाली सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मागील तीन महिन्यांपासून सहायक पोलिस निरीक्षक पदावर कुंदन सोनोने (रा. इंदिरानगर) हे कार्यरत होते. दिवसभराचे कर्तव्य बजावून संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान ते आपल्या दुचाकीने (एम.एच१५ सीवाय ४१४०) घराकडे निघाले होते. आर्टीलरी सेंटरच्या हद्दीतून ते वडनेरगेटच्या दिशेने जात असताना या भागातील एका रस्त्यावर अचानकपणे सोनोने यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले.
यामुळे त्यांची दुचाकी ही रस्त्यावरून येणाऱ्या लष्कराच्या ट्रकच्या (०५डी१६२७४६एम) क्लीनरच्या दरवाजाजवळून पुढील चाकाच्या पाठीमागून खाली शिरली.
अपघात झाल्याचे लक्षात येताच ट्रकचालकाने जागीच ब्रेक लगावला, तत्काळ जखमी सोनोने यांना ट्रकमधील जवानांनी बाहेर काढून जवळच्या सैन्य रुग्णालयात हलविले; मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच लष्करी अधिकाऱ्यांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सरू होते