नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सुरगाणा येथे बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करुन त्याच्याकडून १८ प्रकारचे ११ हजार ५३४ रुपये किमतीची वैद्यकीय औषधे जप्त करण्यात आले.
या बोगस डॅाक्टराकडे कुठेलही वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांना अॅलोपॅथी औषधांच्या आधारे प्रॅक्टिस करत असल्याने चौकशीत निष्पन्न झाले. सदर बोगस डॉक्टरवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे ३३, ३४ व ३६ प्रमाणे बाऱ्हे पोलिस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास हा बाऱ्हे पोलिसांकडून करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना सुरगाणा येथील ग्रामपंचायत बाऱ्हे येथे एक व्यक्ती कुठलीही वैद्यकीय पदवी नसतांना डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांना सदर प्रकरणी शहानिशा करून कारवाई करावी असे निर्देश दिले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांना सुरगाणा येथील प्रकाराबाबत चौकशी पथक पाठवण्याचे सूचना केल्या.
यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर यांच्यासमवेत डॉ. देवानंद चौधरी, डॉ. अक्षय पाटील, औषध निर्माण अधिकारी तुषार चौधरी, आरोग्य सेवक कपिल जाधव यांच्या चौकशी पथकाने पंच यांच्या समवेत आमदा बाऱ्हे फाटा येथे रोडलगत पत्र्याच्या शेड मध्ये एक इसम हा खुर्चीवर बसलेला दिसला.
त्याची चौकशी केली असता सदर इसमाने स्वतःचे नाव दीपक ज्योतीन ओझा वय ३८ वर्षे असे सांगितले, सदर इसम तो पश्चिम बंगाल येथील फूलतला तालुका जिल्हा चोवीस परगाना येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुठलीही वैद्यकीय पदवी नसतांना प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोर यांनी केले आहे.