नाशिक: आयुर्वेद कॉलेजमध्ये ॲडमिशनचे आमिष दाखवून १६ लाख रुपयांचा गंडा!

नाशिक (प्रतिनिधी): बीएएमएस या वैद्यकीय पदवीसाठी मुंबईतील आयुर्वेदिक महाविद्यालयात ॲडमिशन करून देण्याचे आमिष दाखवून संशयिताने एकाला तब्बल १६ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक गणपती कांबळे (रा. अहिम्सा टेरेस, मालाड, मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. संजयकुमार धोंडिराम पगारे (रा. संजोग बंगला, सिद्धार्थ कॉलनी, मखमलाबाद) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा अथर्व यास वैदयकीय शिक्षण घ्यायचे होते. जानेवारी २०२२ मध्ये संशयित कांबळे याने पगारे यांना फोनवरून संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या मुलासाठी बीएएमएस या वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी कर्नाटकातील कृष्णा आयुर्वेद महाविद्यालय, नवीमुंबई नेरूळ येथील डी.वाय. पाटील आयुर्वेदिक महाविदयालय आणि वरळीतील पोतदार आयुर्वेदिक महाविद्यालय याठिकाणी ॲडमिशन करून देतो असे सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: सायंकाळनंतर सिटीलिंक बस मार्गात बदल; देखावे बघण्यास गर्दी वाढत असल्याने निर्णय

त्यानंतर वारंवार संपर्क साधून संशयिताने पगारे यांचा विश्वास संपादन केल्यानंतर १६ लाख २२ हजार रुपये वेळोवेळी बँकेच्या माध्यमातून घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतरही संशयिताने पगारे यांच्या मुलाचे कोणत्याही आयुर्वेदिक महाविद्यालयात ॲडमिशन करून दिले नाही. तसेच, पगारे यांच्याकडून घेतलेले पैसेही परत केले नाहीत. अखेर पगारे यांनी म्हसरुळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक बळवंत गावित हे तपास करीत आहेत.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790