नाशिक (प्रतिनिधी): गाव नमुना सातवर त्रयस्थ संबंधांना प्रतिबंध असल्याची नोंद न्यायालयीन निकालानुसार हटविण्यासाठी मोडाळे येथील ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकाऱ्यांनी लाच मागितली. ही लाचेची रक्कम स्वीकारताना ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबतचा गुन्हा वाडीव-हे पोलिसांनी दाखल केला आहे.
इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे तक्रारदाराच्या आईवडिलांची शेतजमीन आहे. याबाबतचा वाद न्यायालयात असल्याने गाव नमुना क्रमांक ७ वर त्रयस्थ संबंधांना प्रतिबंध असल्याची नोंद करण्यात आली होती. याबाबत न्यायालयाने निकालात ही नोंद काढण्याचा आदेश दिला. यासाठी तक्रारदाराने मोडाळेच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला अर्ज दिला. ही नोंद काढण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी योगिता धुराजी कचकुरे यांनी १० हजार रुपयांची, तर मंडल अधिकारी दत्तात्रय मनोहर टिळे यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितली.
लाचलुचपत पथकाने छापा टाकून ग्राम महसूल अधिकारी योगिता धुराजी कचकुरे यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप बबन घुगे, हवालदार गणेश निंबाळकर, हवालदार संतोष गांगुर्डे, पोलीस अंमलदार नितीन नेटारे यांच्या पथकाने केली. याबाबत वाडीव-हे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.