नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील महावितरणच्या नाशिक शहर व मालेगाव मंडळातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता विद्युत ग्राहकांना वीज वापराचे योग्य व अचूक वीज बिल देण्यासाठी ग्राहकांचे मीटर रिडींग करण्याबरोबरच वीज बिलाची छपाई करून बिल वितरीत करण्याला महावितरणला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मार्च महिन्यापासून ग्राहकांचे मीटर वाचन बंद करण्याबरोबरच वीज देयकाची छपाई आणि वितरणही बंद करण्यात आले होते. मात्र या काळात ग्राहकांना अचूक बिलासाठी महावितरणच्या मोबाईल अँपवरून मिटर रिडींग पाठविण्याचे व ऑनलाईन देयक भरण्याचे आवाहन केले होते, ज्या ग्राहकांचे मीटर रिडींग मिळाले नाही त्यांना मागील वीज बिलाच्या रिडिंगच्या आधारे सरासरी वीज बिल देण्यात आले आणि सदर वीज बिल एसएमएस व्दारे ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठविण्यात आले.
नाशिक जिल्हाधिकारी महोदय यांना संबंधित कार्यासाठी अधिक्षक अभियंता यांनी परवानगी मागितली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपाययोजनाच्या आधीन राहून योग्य ती काळजी घेत सदर कार्ये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार संबंधितांनी कार्याच्या ठिकाणी स्वच्छता, मास्क व सॅनीटायझरचा वापर, सुरक्षित शारिरिक अंतर ठेवणे याबाबत सूचना दिल्या आहेत. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमाचे काटेकोर पालन करीत वीज ग्राहकांना वीज वापराचे अचूक वीज बिल देण्यासाठी मीटर वाचन,बिल छपाई आणि वीज बिलाचे वितरण करण्यात येणार आहे. संबंधित एजन्सीला याबाबत सूचना व निर्देश महावितरणकडून देण्यात आले आहेत.
मागील दोन महिन्यांपासून सर्वजण घरी असल्यामुळे आणि तापमानामुळे विद्युत उपकरणांचा वापर जास्त झाला आहे. त्यामुळे मागील देयके प्रत्यक्ष रिडींग न मिळाल्यामुळे सरासरी देण्यात आली होती. मात्र यावेळी वीज वापराचे वास्तविक रिडींग मिळणार असल्यामुळे अचूक देयक मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या काळातील वीज वापराचा विचार करता आपल्या मिटरवरील रिडींग व देयक याची आपणच खात्री करावी, कुठल्याही कारणाने आपले रिडींग न घेतले गेल्यास आपल्याला मेसेज आल्यानंतर रिडींग मोबाईलअँप मधून पाठवू शकतात. यासोबतच जिल्ह्यात विद्युत भरणा केंद्रे सुद्धा सुरू करण्यात आलीअसून ऑनलाईन देयके भरण्याची सुविधा सुद्धा आहे. त्यामुळे ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.