नाशिक: मराठा आरक्षणासाठी खासदार हेमंत गोडसेंचा राजीनामा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजत असून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने, उपोषण सुरु केली आहेत. तसेच राज्यभरात मराठा आंदोलकांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली असून अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नेते यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.

काल शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहीत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनीही मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर आता नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेल्या ४८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज या आंदोलकांना भेटण्यासाठी खासदार हेमंत गोडसे आले होते. त्यावेळी आंदोलकांनी गोडसे यांना जाब विचारत समाजासाठी राजीनामा द्या अशी मागणी केली होती. त्यानुसार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर नाशिकमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले होते. दोन दिवसांपासून आंदोलकांपैकी नाना बच्छाव यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दिवसेंदिवस नाशिकमध्ये आंदोलन तीव्र होत असून दीडशेहुन अधिक गावांत राजकीय नेते आणि मंत्र्यांना गावबंदी करण्यात आली आहे. उलट समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक मंत्र्यांचे दौरे आणि कार्यक्रम रद्द होत आहेत. याच ठिकाणी आज खासदार गोडसे आंदोलकांना भेटण्यासाठी आले असता आंदोलकांनी संताप व्यक्त केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790