नाशिक (प्रतिनिधी): मोबाईल हिसकावून त्यातील पे फोनद्वारे परस्पर रक्कम लंपास करणाऱ्या दोघा संशयीतांना मुंबई नाका पोलिसांकडून अटक करण्यात आली. आदर्श सदाशिव निंबाळकर (२१, रा. आंबेडकरवाडी), नवाज हसन खान (२१, रा. बजरंगवाडी) असे संशयितांचे नाव आहे.
तक्रारदार गोविंदनगर येथील लक्ष्मण दावड शुक्रवारी (ता. २३) सकाळी चारच्या सुमारास मनोहर गार्डन येथून जात होते. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पोबारा केला.
त्यानंतर त्यांच्या मोबाईलमधील ‘फोन पे’च्या माध्यमातून सुमारे १९ हजार ७०० रुपयांची रक्कम काढून घेतली. श्री. दावड यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शोध पथकाचे समीर शेख यांना संशयितांची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पाटील, रोहिदास सोनार, समीर शेख, नवनाथ उगले, योगेश अपसुंदे, गणेश बोरणारे यांनी बजरंगवाडी येथे सापळा रचून दोघा संशयीतांना ताब्यात घेतले.
त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल आणि गुन्ह्यातील दुचाकी हस्तगत केली.
संशयितांनी ‘फोन पे’ द्वारे त्याच्या स्वतःच्या मोबाईलवर रक्कम वर्ग करणे दोघांना महागात पडले. ज्या मोबाईल क्रमांकावर रक्कम वर्ग झाली, त्याची माहिती काढल्याने गुन्हा उघडकीस येण्यास मदत झाली.