नाशिक: तब्बल ४० लाख रुपयांची लाचेची मागणी; ‘हा’ बडा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक (प्रतिनिधी):  नाशिकमध्ये लाचखोरीने कळस गाठला आहे. गेल्या सहा महिन्यात अनेक लाचखोरांवर कारवाई झाली आहे. आताही एक मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे.

दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) डॉ. निलेश अपार हा तब्बल ४० लाखांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या सापळ्यात सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात प्रचंड लाचखोरी सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आठवड्याला किमान २ जण तरी लाच घेताना पकडले जात आहेत. एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात जोरदार कारवाई आहे.

त्यामुळे तक्रारदारांचे प्रमाणही वाढत असून लाचखोर दिवसागणिक समोर येत आहेत. आतापर्यंत जिल्हा उपनिबंधक, शिक्षणाधिकारी यासारखे बडे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. आताही महसूल विभागातील क्लास वन अधिकारी एसीबीच्या गळाला लागला आहे.

दिंडोरीचा उपविभागीय अधिकारी निलेश अपार हा एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. एका खाजगी कंपनीची जागा अकृषक (एनए) करुन देण्यासाठी अपार सुरुवातीला ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती ४० लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दाखवली. लाच स्वीकारण्यात आलेली नाही. मात्र लाच स्वीकारण्याची तयारी दाखवल्याने मिळालेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर याबाबत एसीबीकडे तक्रार आली. या तक्रारीवरून निलेश अपार यांच्यावर त्यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस स्टेशन येथे रजिस्टर क्रमांक ३३१/ २०२३, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीच्या या मोठ्या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत. शिवाय महसूल यंत्रणाही अतिशय सतर्क झाली आहे. आतापर्यंत शिक्षण, पोलिस अशा विविध विभागात सापळे यशस्वी होत होते. आता महसूल विभागातही लाचखोरी बोकाळल्याचे दिसून येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790