नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरीत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी लुटमार करणाऱ्या व टोळीयुद्धातून सराईत गुंड संजय धामणे याचा खून करणऱ्या डेव्हिड टोळीविरोधात ‘मोका’न्वये (संघटित गुन्हेगारी) कारवाई करण्यात आलेली आहे.
आता या टोळीचा म्होरक्या व सराईत गुन्हेगार कवूभाई ऊर्फ फ्रान्सिस पॅट्रिक मॅनवेल याच्यावरही ‘मोका’न्वये कारवाई करण्यात आली. कवूभाईला २०२३ च्या प्रारंभी विक्रोळीतून अटक करण्यात आली होती.
डेव्हिड टोळीने डिसेंबर २०२० मध्ये सराईत गुंड संजय बबन धामणे (रा. देवळालीगाव) याचा खून केला होता. पोलिसांनी आशा पॅट्रिक मॅकवेल, सायमन पॅट्रिक मॅनवेल ऊर्फ छोटा पापा (वय २२), अजय पॅट्रिक मॅनवेल ऊर्फ आज्या (२७, दोघे रा. गायकवाडनगर, इगतपुरी), अजय ऊर्फ टकल्या राजू पवार (रा. बजरंगवाडी, इगतपुरी) यांच्यावर यापूर्वीच ‘मोकां’तर्गत कारवाई केली आहे. फरारी असलेल्या डेव्हिड गँगचा म्होरक्या कवूभाईला विक्रोळीत अटक केली होती.
दरम्यान, संशयित छोटा पापाचा भाऊ डेव्हिड याचा मृत संजय धामणेच्या गटाने खून केला होता. वर्चस्ववादातून झालेल्या या खुनानंतर कारागृहातून धामणे काही दिवसांसाठी बाहेर आला. त्या वेळी छोटा पापा, त्याची बहीण, भाऊ, आई व इतर तीन संशयितांनी मिळून संजय धामणेचा खात्मा केला होता.
पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील यांच्या पथकाने संशयितांना अटक केली. या टोळीवर संघटित गुन्हेगारीमुळे ‘मोकां’तर्गत कारवाई करण्यात आली.