नाशिक। दि. २ जुलै २०२५: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने जोर धरला असून राज्यातील अनेक भागांत पावसाचा वेग वाढला आहे. नद्या-नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने सखल भागांत पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी राज्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसामुळे शाळा, महाविद्यालये आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत असून, पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंदुदुर्ग, नाशिक, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
यलो अलर्ट: पालघर, ठाणे,मुंबई, धुळे, जळगाव, चंद्रपूर, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.
जूनमध्ये चेरापुंजीपेक्षा ताम्हिणीत अधिक पाऊस:
ताम्हिणी येथे जून महिन्यात २,५१५ मिलीमीटर पाऊस पडल्याने यंदा चेरापुंजीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेरापुंजीत जूनमध्ये केवळ १,००० मिलीमीटर पाऊस झाला. ताम्हिणीप्रमाणेच लोणावळा आणि मुळशी येथेही मुसळधार पावसाने हजेरी लावली. लोणावळ्यात १,३५० मिलीमीटर, तर मुळशीत १,३४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या आकडेवारीनुसार, ही दोन्ही ठिकाणेही चेरापुंजीला मागे टाकत पावसाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. मुसळधार पावसामुळे या भागांत पाणी साचण्याचा धोका वाढला असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.