जलसमृद्ध नाशिक अभियानाचा शुभारंभ; विविध संस्थांची साथ

नाशिक (प्रतिनिधी): भविष्यातील पाणीटंचाईची दाहकता दूर करण्यासाठी जलसमृद्ध नाशिक अभियानास सर्व स्तरावरून प्रतिसाद लाभत आहे. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे प्रत्येक नाशिककराचे श्रम व स्वयंस्फूर्त योगदान या अभियानासाठी अतिमहत्वाचे ठरणार आहे. त्यातूनच हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे व्यक्त केला.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसमृद्ध नाशिक अभियान 2024 चा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. गंगापूर धरण येथील गंगावऱ्हे गावापासून जलसमृद्ध नाशिक अभियान 2024 चा शुभारंभ त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जतिन रहमान, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांच्यासह संबंधित अधिकारी व सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक, बांधकाम संघटनांचे प्रतिनिधी, गंगावऱ्हे, सावरगाव व बेळगाव ढगा या गावातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलसमृद्ध नाशिक अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक, सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने योगदान द्यावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, मागील काळात सन 2018-19 मध्ये यवतमाळ व बुलढाणा येथे प्रशासन व लोकसहभागातून अशा प्रकारची कामे करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये हे अभियान राबविताना आज सेवाभावी व इतर सर्व संस्था, नागरिक यांची सढळ हाताने झालेली मदत पाहता या अभियानाची व्याप्ती येणाऱ्या काळात निश्चितच गती घेणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा पुढे म्हणाले, जलसमृद्ध अभियानातून हरित नाशिक व पाण्याने समृद्ध असलेला जिल्हा साकार करावयाचा आहे. आजपासून 15 जून 2024 पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानास चांगला प्रतिसाद लाभत गेल्यास अभियानाचा कालावधी पुढे वाढविण्यात येवून गंगापूर धरणासोबतच इतर धरणे व जलाशयातून गाळ काढण्याचे काम करण्यात येणार आहे. भविष्यात दरवर्षी हे अभियान राबविण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील. तसेच धरणालगतच्या शेतजमिनींचे सीमांकन निश्चित करण्यासंदर्भात तलाठी यांना सूचित करून त्यानुसार गाळ काढण्याचे काम केले जाईल, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा पुढे म्हणाले, या अभियानात धरणांमध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ लोकसहभागातून काढला जाणार असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना हा सुपीक गाळ त्यांच्या शेतात टाकण्यासाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे. यातून मोठ्या जलाशयांची पाणीसाठवण क्षमता वृद्धीस लागून शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होवून उत्पादनक्षमता वाढणार आहे. यासोबतच परत धरणांमध्ये गाळ साचू नये यासाठी जमिनीची होणारी धूप थांबविण्यासाठी व कमी करण्यासाठी नद्यांच्या उगमस्थानापासून विशेष प्रयत्न केले जाणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासनामार्फत गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे. धरणांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्याची मोहीम आज येथे सुरू होत असून यातून काढलेला सुपीक गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वाहून नेण्याची जबाबदारी पार पाडावयची आहे. गाळ काढल्यामुळे या जलाशयाची पाणीधारण क्षमता निश्चितच वाढीला लागणार आहे. गंगापूर धरणासोबत दारणा धरणही महत्त्वाचे असून या धरणामधून इतर शहरांनाही पाणी पुरविले जाते. या धरणांची गाळ काढण्याची मोहीम हाती घेतल्यास धरणालगत शहरीकरण नसल्याने काढलेला गाळ वाहून नेण्यास अडचण निर्माण होणार नाही. तसेच यासाठी लागणाऱ्या परवानग्या व इतर सहकार्यासाठी जलसंपदा विभाग सदैव तत्पर असल्याचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी यावेळी सांगितले

जलसमृद्ध नाशिक अभियान 2024 साठी भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाउंडेशन  व आर्ट ऑफ लिव्हिंग यांचे विशेष पाठबळ लाभले आहे. यावेळी जलसमृद्ध अभियानासाठी सढळ हाताने मदत केलेल्या संस्थाप्रमुख व व्यक्ती यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नंदकुमार साखला यांनी केले तर आभार रमेश वैश्य यांनी मानले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790