अंदमानात मान्सूनच्या आगमनाची चाहूल; १४ ते २० मेदरम्यान दाखल होण्याची शक्यता

मुंबई। दि. १० मे २०२६: राज्यात वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले असताना, आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या हालचालींकडे लागले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, नैर्ऋत्य मान्सून १४ ते २० मेदरम्यान अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने मान्सूनचे आगमन सरासरीपेक्षा लवकर होण्याचे संकेत दिले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात नैर्ऋत्येकडून वाहणारे वारे सक्रिय होण्यास सुरुवात होणार असून, त्याच पार्श्वभूमीवर अंदमान परिसरात मान्सूनसदृश परिस्थिती निर्माण होईल. अंदमान समुद्रासह निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, १२ आणि १३ मेदरम्यान बंगालच्या उपसागराच्या अतिदक्षिण-पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही प्रणाली दक्षिण श्रीलंका आणि मालदीव परिसरात प्रभावी राहू शकते. त्यासोबत पूर्व-पश्चिम दिशेने द्रोणीय स्थिती तयार झाल्याने आग्नेय अरबी समुद्र, हिंदी महासागरातील विषुववृत्तीय भाग आणि दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये हवामानातील हालचाली वाढण्याचा अंदाज आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

हवामान तज्ज्ञांच्या मते, १३ मेनंतर पुढील ४८ तासांत ही प्रणाली अधिक तीव्र होऊ शकते. याचाच परिणाम म्हणून केरळ किनारपट्टीवरही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार, १४ ते १६ मेदरम्यान केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पूर्व-मान्सून पावसाची शक्यता असून, त्यामुळे भारतीय मुख्य भूमीवर मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा लवकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790