नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एचडीएफसी बँकेच्या घोटी येथील शाखेतील तीन खातेदारांनी त्यांचे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्याकडे दिले.
कर्मचाऱ्याने ते क्रेडिट कार्ड बंद न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरून तब्बल २८ लाख २७ हजार रुपयांचे व्यवहार करीत बँक व खातेदाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी घोटी पोलिसात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल राजन नांदे (रा. योगेश्वर अपार्टमेंट, हिरावाडी रोड, पंचवटी) असे गंडा घालणाऱ्या संशयिताचे नाव आहे. एचडीएफसी बँकेच्या घोटी शाखेचे व्यवस्थापक विशाल रामराव हरदास (रा. चेतनानगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित स्वप्निल नांदे हा या शाखेमध्ये फेब्रुवारी २०२१ ते जुलै २०२३ या दरम्यान कामास होता.
यादरम्यान बँकेतील खातेदार धनंजय निवृत्ती चव्हाण, रमेश कारभारी काळे, रविकांत नारायण कडू यांनी त्यांचे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी संशयित नांदे याच्याकडे दिले होते.
परंतु, नांदे याने सदरील क्रेडिट कार्ड बंद न करता त्या कार्डवरील मोबाईल क्रमांक व इ-मेल आयडी बदलून त्या कार्डचा स्वत:साठी गैरवापर केला.
तसेच, त्या कार्डचा वापर करून २८ लाख २७ हजार ३४० रुपयांचे व्यवहार करून त्याचे बील न भरता बँक आणि खातेदारांची फसवणूक केली. सदरची बाब बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर चौकशी अंती सदरचा प्रकार निष्पन्न झाला.
याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात संशयित नांदे याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित नांदे हा सध्या पुण्यातील एका फायनान्स बँकेत कामाला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.