नाशिक (प्रतिनिधी): शहरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एमपीडीए कायद्यानुसार मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
दिलीप विष्णु गायकवाड (२५, रा. सिद्धार्थनगर, कॉलेजरोड) असे स्थानबद्ध केलेल्याचे सराईत गुंडाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप गायकवाड याच्याविरोधात मारहाण, खुनाचा प्रयत्न, हत्यारे बाळगणे आदी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर याआधीही वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
त्यानुसार, १७ मे २०२२ रोजी शहर व जिल्ह्यातून गायकवाड यास तडीपार करण्यात आले होते. मात्र तरीदेखील त्याच्या वर्तवणूकीत सुधारणा न होता त्याचे गुन्हेगारी कृत्य सुरुच ठेवले होते.
त्यामुळे याची दखल घेत पोलिस आयुक्त शिंदे यांनी शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित रहावी या हेतूने दिलीप गायकवाड यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
९ महिन्यात ११ गुंड स्थानबद्ध:
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सराईत गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केलेली आहे. त्याअंतर्गतच दोन व त्यापेक्षा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारी, स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.
सणउत्सवात गुन्हेगारांकडून गालबोट लागण्यची शक्यता आहे. त्यानुसार आयुक्तांनी सराईत गुंडाविरोधात प्रतिबंधात्म कारवाई राबविली.
त्यानुसार २०२१ मध्ये ९, २०२२ मध्ये २ तर चालू वर्षात ११ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करीत त्याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलेली अहे