नाशिक (प्रतिनिधी): व्हिडिओ लाईकच्या नावाखाली अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून अज्ञात मोबाईलधारकाने एका इसमास साडेनऊ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
कचेश्वर केरूजी काळंगे-पाटील (वय 50, रा. गुरुमहिमा, गुरूनगर, जयाबाई कॉलनी, नाशिकरोड) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी अज्ञात स्टीव्हन वॉकर/व्हॉट्सअॅप आयडीधारक, टेलिग्राम आयडीधारक, तसेच आयसीआयसीआय बँक व पंजाब नॅशनल बँक खातेधारकांनी संगनमत करून फिर्यादी कचेश्वर काळंगे यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधला.
काळंगे यांना यूट्यूब व्हिडिओ लाईकच्या नावाखाली टेलिग्राम अॅपद्वारे टास्क देण्यात आला, तसेच अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून काळंगे यांना वेळोवेळी नमूद केलेल्या वेगवेगळ्या पेटीएम आयडी व बँक खात्यांवर 9 लाख 43 हजार रुपयांची रक्कम भरण्यास लावली;
मात्र ही रक्कम गुंतवूनही अधिकचा परतावा मिळाला नाही. म्हणून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काळंगे यांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.