मुंबई, दि. 20 मे 2025: महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज, २० मे २०२५ रोजी, राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही या सोहळ्यात उपस्थिती होती.
सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली. त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली. शपथविधी नंतर राज्यपालांनी भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील श्री.भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येणार असल्याचे समजते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील ही जागा रिक्त होती. भुजबळ यांना डिसेंबर २०२४ च्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे त्यांचे पुनरागमन हे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
गेल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार अस्तित्वात आल्यावर डिसेंबर 2024 मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. या विस्तारावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे भुजबळ काहीसे नाराज झाले होते. यानंतर त्यांनी विविध माध्यमातून आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. अखेर भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली असून, त्यांनी आज सकाळी दहा वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग ,मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय विकास विभाग मंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे,तसेच मंत्री छगन भुजबळ यांचे कुटूंबीय यावेळी उपस्थित होते.