नाशिक (प्रतिनिधी): हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून लाखो रुपयांच्या इंधनाची चोरी करून त्याचे ड्रम भरून शेतात दडविल्याचा धक्कादायक प्रकार वाडीवऱ्हे पोलिसांच्या हद्दीत उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांच्या टोळीला अटक केली आहे. लक्ष्मण तानाजी धोंगडे, दिनेश तानाजी धोंगडे (दोघे रा. पाडळी शिवार, इगतपुरी), रमेश शिवमुरत यादव (रा. साकीनाका, मुंबई) व अफजल इक्बाल हुसैन (रा. उत्तरप्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी दिनेश पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी कौशिक सरोजित भौमिक (वय ३१, रा. सातपूर) यांनी वाडीवऱ्हे पोलिसांता याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित लक्ष्मण धोंगडे हा त्याच्या शेतातील घराजवळ अवैधरित्या ज्वलनशील इंधनाची चोरी करून साठा करीत असल्याची पडताळणी पोलिसांनी केली. त्यानुसार वाडीवऱ्हे पोलिसांसह पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांनी धोंगडेच्या शेतात छापा मारला. तेव्हा, दिनेश पसार झाला, तर इतर संशयितांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.
दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी ‘एमएच ०३ सीव्ही ६६७४’ क्रमांकाच्या पेट्रोल टँकरसह एक कार जप्त केली. या टँकरमध्ये दोनशे लिटर पेट्रोलसदृश्य ज्वालाग्रही पदार्थ, तीनशे लिटर डिझेलसदृश्य ज्वालाग्रही पदार्थ असा इंधनसाठा जप्त करण्यात आला. यासह रिकामे ड्रम, इंधन चोरीसाठीची मोटर, नोझल, पाइप असा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला.
टँकरमधील २० हजार लिटर इंधनासह टँकर असा ३८ लाख ६५ हजार ४६१ रुपयांचा इंधनसाठा, ४ लाख रुपयांचा पिकअप जप्त केला. यासह देशी मद्याच्या बाटल्या असा एकूण ५७ लाख ५८ हजार ५२१ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात चोरी, अपहारसह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ नुसार, दारुबंदी कायद्यानुसार व इतर कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे.