नाशिक: लॉन्समध्ये शिरला बिबट्या, चिमुकल्याने प्रसंगावधान दाखवत खोलीत केले जेरबंद

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहराजवळील मालेगाव-नामपूर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन लाॅन्सच्या कार्यालयात सकाळी साडेसातच्या सुमारास शिरलेल्या बिबट्याला वन विभागाच्या बचाव पथकाने दोन तासानंतर बेशुध्द करत जेरबंद केले. लॉन्सच्या कार्यालयात बसलेल्या चिमुकल्या मोहित विजय आहिरे (वय १२) याच्या प्रसंगावधानामुळे बिबट्या (Leopard) जेरबंद झाला.

अन्यथा हा बिबट्या शहरातील मानवी वस्तीत शिरला असता तर अनर्थ होवून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण झाला असता. गेल्या एक महिन्यापासून या भागातील वडगाव, लेंडाणे, कुकाणे, वजीरखेडे परिसरात वावरणारा बिबट्या सहजासहजी जेरबंद झाल्याने मोहीतच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शहराजवळील शेत वस्तीतील बिबट्या भक्ष्य व पाण्याच्या शोधात मंगळवारी (ता. ५) सकाळी सातच्या सुमारास संकेत गार्डन या रहिवासी परिसरात दिसून आला. त्याचवेळी परिसरातील रहिवशांमध्ये बिबट्या आल्याची चर्चा सुरु झाली. याच भागातून फिरत बिबट्या नजीकच्या साई सेलिब्रेशन लॉन्समधील कार्यालयात घुसला.

त्यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील कॉटवर मोहीत बसलेला होता. त्याच्या जवळूनच बिबट्या कार्यालयात घुसला. बिबट्याचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. मोहित बिबट्याला पाहताच थोडा बिथरला. कॉटवरुन तातडीने उतरत त्याने प्रसंगावधान राखून कार्यालयाचा दरवाजा बंद केला.

कार्यालयात एका बाजुला बिबट्या निवांत पहुडला होता. घरी धाव घेत मोहितने वडील विजय आहिरे व कुटुंबियांना ही माहिती दिली. बिबट्याची आवई ऐकूण बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने जमले होते. वडनेर खाकुर्डी पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला होता.

वन अधिकारी वैभव हिरे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने नाशिक येथे माहिती कळविली. वन विभागाचे नाशिक येथील बचाव पथक साडेदहाच्या सुमारास येथे दाखल झाले. या पथकाने कार्यालयाची खिडकी उघडून बिबट्याची पाहणी केली.

यानंतर खिडकीतून ब्लो पाईपने डॉट देत बिबट्याला बेशुध्द केले. तत्पुर्वी बिबट्याने खिडकीवर पंजा मारत काच फोडली. दोन तास हे रेसक्यु ऑपरेशन सुरु होते. यानंतर वन विभागाने रेसक्यु करुन विशेष वाहनातून बिबट्याला वन विभागाच्या कार्यालयात आणले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790