नाशिक (प्रतिनिधी): शहरातील खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून डेंग्यू चाचणीसाठी मनमानी पद्धतीने आकारणी होत आहे. हा प्रकार बघून महापालिकेच्या मलेरिया विभागाने डेंग्यूच्या इलायझा चाचणीसाठी ६०० रुपये दर निश्चित करतानाच त्यापेक्षा अधिक शुल्क आकारणाऱ्या प्रयोगशाळा, रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या रेकॉर्डवर डेंग्यूचे ५८ रुग्ण असले तरी त्यापेक्षा अधिक रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये असल्याचा संशय असून किरकोळ लक्षणांवरून थेट डेंग्यूची चाचणी करण्याचा सल्ला दिला जात असल्याच्याही तक्रारी आहेत.
शहरात कागदोपत्री पेस्ट कंट्रोल फवारणी सुरू असून ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये डास उत्पत्ती करणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या पंधरवड्यात डेंग्यूचे ५६ नवे रुग्ण आढळले असून शहरातील डेंग्यूबाधितांचा एकूण आकडा २२५ च्या घरात गेला आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या तुलनेमध्ये कमी असली तरी शंभरहून अधिक डेंग्यू संशयित रुग्णांच्या चाचण्या पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून केल्या जात आहेत.
मात्र खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या डेंग्यूबाधितांची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. दुसरीकडे, ताप, अंगदुखी, थकवा अशा लक्षणांचे रुग्ण वाढत असून ही सर्व लक्षणे डेंग्यूशी साधर्म्य असणारी असल्याने डॉक्टरांकडून पॅथॉलॉजीमार्फत तपासणी करण्याबाबत शिफारस केली जात आहे. त्यामुळे डेंग्यूच्या इलायझा चाचणीसाठी काही खासगी लॅबकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणी सुरू झाल्याच्या तक्रारी वाढत आहे.
महापालिकेने डेंग्यूच्या इलायझा चाचणीकरिता शासनाने ६०० रुपये दर निश्चित केले असून काही ठिकाणी ८०० ते १२०० रुपयांपर्यंत दर आकारणी केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास संबंधित खासगी प्रयोगशाळा, दवाखाना, रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तक्रार केल्यास चौकशी करून कारवाई:
डेंग्यूच्या इलायझा चाचणीसाठी शासनाने ६०० रुपये दर निश्चित केले आहेत. खासगी प्रयोगशाळा, दवाखाने, रुग्णालयांना यापेक्षा अधिक शुल्क आकारता येणार नाही. तसे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. याबबत तक्रार केल्यास संबंधिताची चौकशी करून कारवाई केली जाईल. – डॉ. राजेंद्र त्र्यंबके, विभागप्रमुख, मलेरिया विभाग