नाशिक (प्रतिनिधी): आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि ऑपरेशन हॉस्पिटल चळवळीचे जितेंद्र भावे व त्यांचे सहकारी यांच्याविरुद्ध कॉलेजरोडच्या विजन हॉस्पिटलचे डॉ. विक्रांत विनोद विजन यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपचारांच्या बिलांवरून भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि स्टाफ यांना ध’मकाविल्याचे त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे.
डॉ. विजन यांनी दिलेली फिर्याद आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दत्तात्रय पांडुरंग आटवणे हे विजन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल होते. दि. २१ मे रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी रुग्णाचा मुलगा, मुलगी तसेच त्यांच्यासोबत जितेंद्र भावे आणि त्यांचे सहकारी यांनी हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये गर्दी केली. हॉस्पिटलने जास्त बिल आकारल्याचे सांगून रुग्णावर केलेल्या उपचारांच्या मूळ कागदपत्रांची मागणी केली. त्याचप्रमाणे हॉस्पिटल प्रशासनास वेठीस धरून हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि स्टाफ यांना ध’मकावून हॉस्पिटलच्या कामकाजात अडथळा निर्माण केला.
तसेच रुग्णास आलेला वैद्यकीय, मेडिकल, आणि रक्त तपासणीच्या खर्चाची मूळ बिले घेऊन बाकी राहिलेली रक्कम न भरता निघून गेले, असे फिर्यादीत म्हंटले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर नंबर: ८२/२०२१) महाराष्ट्र वैद्यकीय सेवा. व्यक्ती आणी वैद्यकीय सेवा संस्था हि’संक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान प्रति अधिनियम 2010 चे कलम 04, सह साथरोग सुधारणा अधिनियम 2020 चे कलम 03 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक खाजगी हॉस्पिटल्स आकारात असलेल्या अवाजवी बिलाविरुद्ध जितेंद्र भावे आणि त्यांचे सहकारी हे गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत. दोन दिवसांपूर्वीच जितेंद्र भावे यांनी ऑपरेशन हॉस्पिटल या चळवळी अंतर्गत वोक्हार्ट हॉस्पिटल येथे आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. यावेळी नाशिककरांनी भावे यांच्या आंदोलनाला समर्थन दिले होते. त्यानंतर हॉस्पिटलची कुठलीही तक्रार नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले होते.