नाशिक (प्रतिनिधी): तृतीयपंथी प्रेयसीशी झालेल्या वादातून त्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या दाेन मैत्रिणींवर संशयिताने कोयत्याने वार केला. या हल्ल्यात एकीचा हात तोडला तर प्रेयसीवर प्राणघातक हल्ला करून तिलाही गंभीर जखमी केले. फुलेनगर परिसरातील वैशालीनगर येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी हेमंत बाबूराव गांगुर्डे (रा. फुलेनगर) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित तृतीयपंथी प्रेयसीने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित हेमंत गांगुर्डे याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत. दोन दिवसांपूर्वी पेठरोड येथील घरी संशयिताने येऊन भांडण केले, शिवीगाळ केली. या भांडणाचा जाब विचारण्यासाठी पीडित आणि तिची तृतीयपंथीय मैत्रीण या संशयिताच्या फुलेनगर येथील घरी आल्या. तू माझ्या घरी येऊन तमाशा का करताे, असे विचारले असता याचा राग आल्याने संशयिताने कमरेला लावलेला कोयता काढून पीडितेच्या मैत्रिणीवर वार केला.यात तिचा हात मनगटापासून तुटला, तिला वाचवण्यासाठी पीडिता गेली असता तिच्यावरही वार करून पाय फ्रॅक्चर केला.
तुमची कटकटच संपवून टाकतो अशी धमकी दिली. अशी तक्रार पोलिसांना दिली. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.