अल्पवयीन मुलींना फूस लावून लग्नाचा डाव, २० जणांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी तालुक्यातील रवळगाव येथील दोघा अल्पवयीन मुलींना तुमच्या कुटुंबियांना पैसे देतो असे आमिष दाखवून पळवून नेत कुटुंबियांच्या संमतीविना त्यांच्याशी विवाह करू पाहणाऱ्या येवल्यातील दोघा वरांसह त्यांच्या कुटुंबियांतील २० जणांना रवळगावच्या ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

रवळगाव येथील आदिवासी समाजातील परिस्थितीने गरीब असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा विवाह येवला तालुक्यातील कासारखेडे व सावरगाव येथील विवाहेच्छुक तरुणांशी लावून देण्यासाठी रवळगाव येथील एक महिला व येवला तालुक्यातील दलाल दशरथ गंगाधर पवार (रा. सावरगाव) यांनी या दोन मुलींना त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीविना फूस लावून पळवून नेले. कासारखेडे येथे दोन मुलांशी तुमचा विवाह लावून देतो व त्या बदल्यात तुमच्या कुटुंबियांना आम्ही काही पैसे देतो असे सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: बारावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; जुना गंगापूर नाक्यावरील घटना

दोन मुलींना आई-वडिलांच्या संमतीशिवाय बळजबरीने लग्नासाठी घेऊन जात असल्याची माहिती रवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गोकुळ टोंगारे, सोमनाथ निंबेकर व रवळगाव ग्रामस्थांना समजली. त्यांनी या दोन मुलींच्या घरी जात संबंधित महिला व दोन्ही वराकडील कुटुंबियांना पकडून ठेवत दिंडोरी पोलिसांच्या हवाली केले.

हे ही वाचा:  नाशिक: बंद बंगला, व रो हाऊसचे लॉक तोडून घरफोडी; साडेसात लाखांचा ऐवज लंपास

अमोल दशरथ पवार, सुनीता दशरथ पवार, अक्षय दशरथ पवार, योगेश गोरक्षनाथ घेगडे, वाल्मीक माधव घेगडे, गोकुळ सखाराम जाधव, सागर पोपट गायकवाड, संजय निवृत्ती घेगडे, गोरख सखाराम घेगडे, एकनाथ अशोक गायकवाड, रामेश्वर संजय गायकवाड, रामदास नामदेव गायकवाड, जनाबाई गोरक्षनाथ घेगडे, सीमा ज्ञानेश्वर बोरसे, ज्ञानेश्वर काशीनाथ बोरसे (सर्व रा. कासारखेडे ता. येवला) तसेच अण्णा बारकू मलिक, मीना अण्णा मलिक (रा. दहेगाव, ता. नांदगाव) तसेच वाहनचालक कासम राजू पठाण (रा. विसापूर, ता. येवला) या २० जणांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  उत्तर महाराष्ट्रात २ दिवस मध्यम पावसाची शक्यता

याबाबतची माहिती दिंडोरी पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण व कर्मचाऱ्यांनी रवळगावला जात या २० जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध मुलींच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार पाेक्सो कायदा तसेच अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, पोलिस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790