🌞 आजचे तापमान- किमान: 14.8°C । कमाल: 32.9 °C

नाशिक: द्वारका सर्कल इंटरचेंजचे ८० टक्के काम पूर्ण; जानेवारीत वाहतुकीसाठी खुला होणार

नाशिक। दि. २७ नोव्हेंबर २०२६: शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या इंटरचेंज प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील मुख्य मार्ग जानेवारी २०२७ अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासोबतच नाशिककरांना दीर्घकालीन दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे.

द्वारका सर्कल येथे मुंबई-आग्रा महामार्ग, पुणे रोड, नाशिक रोड आणि शहरांतर्गत वाहतुकीचा मोठा भार एकत्र येतो. त्यामुळे या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (MSIDC) द्वारका सर्कल इंटरचेंज प्रकल्पाचे काम सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडूनही या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

या प्रकल्पात एकूण ५६३ मीटर लांबीचा इंटरचेंज विकसित करण्यात येत असून, त्यामध्ये १०० मीटर लांबीचा व्हेईक्युलर अंडरपास (VUP) उभारण्यात येत आहे. पुणे रोडकडून नाशिक शहराकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी या भुयारी मार्गाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे द्वारका सर्कलवरील चौकात वाहनांची होणारी सरमिसळ कमी होऊन वाहतुकीला अधिक मोकळीक मिळण्याची अपेक्षा आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: संविधान दिनानिमित्त ‘गडाचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमांतर्गत साल्हेर किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, भुयारी मार्गाच्या बांधकामातील बहुतांश महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. पुणे बाजूकडील रॅम्प आणि भुयारी मार्गाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील ५३ मीटर लांबीचे बांधकामही पूर्ण झाले असून, सध्या त्याच्या काँक्रीटच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक क्युरिंग प्रक्रिया सुरू आहे. नाशिक बाजूकडील रॅम्प, विविध युटिलिटींचे स्थलांतर आणि रस्त्यांशी संबंधित इतर कामे प्रगतिपथावर आहेत.

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “द्वारका सर्कल इंटरचेंज प्रकल्प हा केवळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीनेच नव्हे, तर नाशिक शहराच्या भविष्यातील वाहतूक नियोजनासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. शहरातील अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक द्वारका सर्कल येथे एकत्र येत असल्याने या ठिकाणी होणाऱ्या कोंडीचा परिणाम शहरातील वाहतुकीवरही होतो. प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, मुख्य मार्ग जानेवारीअखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट आहे, ही समाधानाची बाब आहे. कुंभमेळ्यापूर्वी ही सुविधा नागरिक आणि भाविकांच्या सेवेत उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पातून नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेला दीर्घकालीन लाभ मिळेल.”

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमधील ई-बाईक टॅक्सी सेवा अवैध; नागरिकांनी प्रवास टाळावा- आरटीओचे आवाहन

या प्रकल्पात पुणे आणि नाशिक या दोन्ही बाजूंना अप्रोच रोड आणि सर्व्हिस रोड विकसित करण्यात येत आहेत. त्यामुळे भुयारी मार्गासह सध्याच्या रस्त्यांशी जोडणी अधिक सुलभ होणार आहे. दरम्यान, मुंबई आणि धुळे बाजूकडील यू-टर्न सुविधांची कामे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात हाती घेण्यात येणार असून, ती कुंभमेळ्यानंतर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलाखाली सुरू असलेले बांधकाम, मर्यादित जागा, भूमिगत पाणीपुरवठा व वीजवाहिन्या तसेच पावसाळ्यातील अडथळे यांमुळे या प्रकल्पाच्या कामात अनेक अभियांत्रिकी आव्हाने होती. उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेची काळजी घेत बांधकाम करणे आणि परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळित होऊ न देणे, हीदेखील मोठी जबाबदारी होती. त्यासाठी टप्प्याटप्प्याने काम, एकाच वेळी विविध ठिकाणी बांधकाम, वाढीव कामाचे तास तसेच वाहतूक पोलिस, महापालिका आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून कामाला गती देण्यात आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक आणि वाहनांची वर्दळ वाढणार आहे. अशा वेळी द्वारका सर्कलसारख्या महत्त्वाच्या जंक्शनवरील वाहतुकीचा ताण कमी होणे आवश्यक आहे. त्यामुळे जानेवारीअखेर मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट कुंभमेळ्याच्या वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. कुंभमेळ्यानंतरही या प्रकल्पामुळे नाशिक शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून १.२२ कोटींची फसवणूक; सातपूरमधील संशयिताला अटक

द्वारका सर्कल इंटरचेंज प्रकल्प : ठळक वैशिष्ट्ये

प्रकल्पाची माहिती:

  • कामाची सद्यस्थिती : सुमारे ८० टक्के पूर्ण
  • मुख्य मार्ग खुला करण्याचे उद्दिष्ट : जानेवारी २०२७ अखेर
  • प्रकल्पाची मंजूर किंमत : २१३.८७ कोटी रुपये
  • एकूण इंटरचेंजची लांबी : ५६३ मीटर

प्रकल्पातील प्रमुख कामे

  • १०० मीटर लांबीचा व्हेईक्युलर अंडरपास (VUP)
  • पुणे बाजूकडील २४० मीटर लांबीचा अप्रोच रोड
  • नाशिक बाजूकडील २२३ मीटर लांबीचा अप्रोच रोड
  • दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड
  • दुसऱ्या टप्प्यात मुंबई आणि धुळे बाजूकडील यू-टर्न सुविधा

प्रकल्पाचे वेळापत्रक

  • फेब्रुवारी २०२६ : कामाचा आदेश जारी
  • नोव्हेंबर २०२६ : सुमारे ८० टक्के काम पूर्ण
  • जानेवारी २०२७ अखेर : मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट
  • फेब्रुवारी २०२७ अखेर : संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत
  • कुंभमेळ्यानंतर : मुंबई आणि धुळे बाजूकडील यू-टर्नची कामे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790