नाशिक: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून ७.५० लाखांची फसवणूक; फरार भोंदूबाबाला अटक

नाशिक। दि. २३ नोव्हेंबर २०२६: पैशांचा पाऊस पाडण्याचे तसेच अस्थम्याचा आजार पूर्णपणे बरा करण्याचे आमिष दाखवून महिलेची ७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या भोंदूबाबाला गुन्हे शाखा अंबड युनिट-३ च्या पथकाने अटक केली आहे. अरुण धोंडू पाटील (वय ४८) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२२ ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सोमेश्वर धबधब्याजवळील गोदावरी परिसरात, गंगापूर रोड येथे संशयित अरुण पाटील याने फिर्यादी महिलेला तिच्या घरी पैशांचा पाऊस पाडण्याचे आणि अस्थम्याचा आजार पूर्णपणे बरा करण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यासाठी जादूटोणा व अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली महिलेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला पारदर्शक कपडे परिधान करण्यास सांगितले. तसेच, तिला पूर्णपणे पाण्याने भिजवून अघोरी पूजा केली.

🔎 हे वाचलं का?:  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून विविध धार्मिक कार्यक्रम

या पूजेच्या मोबदल्यात आरोपीने महिलेकडून ७ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून तिची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.३२ वाजता गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ च्या कलम ३ व ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता रोबोटिक सर्जरीची सुविधा; अपोलो हॉस्पिटल्समध्ये अत्याधुनिक युनिट सुरू

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अरुण धोंडू पाटील फरार झाला होता. तो नाशिक शहर आणि परिसरात आपले अस्तित्व लपवून वास्तव्य करत होता. दरम्यान, तो मखमलाबाद येथील मेंदळे वस्ती परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार गौरव धात्रक, महेंद्र दोंदे आणि राजेश महाले यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा अंबड युनिट-३ चे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या पथकाने २३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता मेंदळे वस्ती, आळंदी पाट, मखमलाबाद येथे सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी शेताच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या 'या' विविध भागांतील वीजपुरवठा रविवारी (दि. २२) बंद राहणार...

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण तसेच पोलीस अंमलदार भगवान जाधव, राजेश महाले, संजय बेनके, गौरव धात्रक, महेंद्र दोंदे, हर्षल जाधव, अरुण चव्हाण आणि महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790