नाशिक: वेदांत काळे हत्या प्रकरणातील फरार संशयिताला राहुडबारी घाटातून अटक

नाशिक। दि. २३ नोव्हेंबर २०२६ : जुन्या भांडणाच्या वादातून मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याप्रकरणी फरार असलेल्या २० वर्षीय संशयिताला गुन्हे शाखा अंबड युनिट-३ च्या पथकाने अटक केली आहे. चांदवड तालुक्यातील राहुडबारी घाट परिसरातील एका हॉटेलमधून ही कारवाई करण्यात आली. दीपेश श्रावण पाचोरे (वय २०, रा. गणेश कॉलनी, त्रिमूर्तीनगर, हिरावाडी रोड, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता रोबोटिक सर्जरीची सुविधा; अपोलो हॉस्पिटल्समध्ये अत्याधुनिक युनिट सुरू

या प्रकरणी जुने नाशिक येथील खैरे गल्ली परिसरातील निशांत चंद्रकांत काळे (वय १७) याने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, त्याचा चुलतभाऊ वेदांत संतोष काळे याची जुन्या भांडणाच्या कारणावरून हत्या करण्यात आली होती. टकलेनगर येथील जिजामाता महिला व्यायामशाळेच्या उद्यानात ही घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित पीयूष लोखंडे आणि त्याचे साथीदार तीन दुचाकींवरून घटनास्थळी आले. त्यांनी वेदांतला गाठल्यानंतर पीयूष लोखंडे याने त्याच्या छातीवर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वेदांतचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या खुनाची कबुली; फरार पतीला अटक, न्यायालयाकडून पोलीस कोठडी

या घटनेनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून दीपेश पाचोरे फरार होता. दरम्यान, तो चांदवड तालुक्यातील राहुडबारी घाट परिसरातील एका हॉटेलमध्ये असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार महेंद्र दोंदे यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित परिसरात सापळा रचला. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास दीपेशला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत गुन्ह्यातील त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पुढील तपास आणि कारवाईसाठी त्याला पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखा अंबड युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790