नाशिक। दि. २१ नोव्हेंबर २०२६: सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींना भुलून ऑनलाइन खरेदी करताना फसवणूक झाल्याचा प्रकार सिडको परिसरात उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवर ड्रेसची रिल पाहून खरेदीची ऑर्डर देणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थिनीला सायबर भामट्यांनी तब्बल ९९ हजार ६०५ रुपयांना गंडा घातला. ड्रेस पाठविण्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली वेगवेगळी कारणे सांगत तिच्याकडून टप्प्याटप्प्याने पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास ही तरुणी घरी असताना इन्स्टाग्रामवर विविध पोस्ट आणि रिल पाहत होती. यावेळी एका इन्स्टाग्राम पेजवर आकर्षक ड्रेसची जाहिरात तिच्या नजरेस पडली. ड्रेस पसंत पडल्याने तिने त्याचा स्क्रीनशॉट घेत संबंधित पेजवर संदेश पाठवून खरेदीची ऑर्डर नोंदवली.
यानंतर विक्रेत्याच्या नावाखाली संपर्क साधणाऱ्या व्यक्तींनी ड्रेस पाठविण्याच्या प्रक्रियेसाठी एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर तसेच फोन-पे आयडीवर पैसे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. ड्रेसच्या ऑर्डरची प्रक्रिया, पाठवणी आणि इतर कारणांचा आधार घेत आरोपींनी तरुणीकडून वारंवार पैशांची मागणी केली.
ड्रेस मिळण्याच्या अपेक्षेने तरुणीने विश्वास ठेवून वेगवेगळ्या खात्यांवर फोन-पेद्वारे एकूण ९९ हजार ६०५ रुपये जमा केले. मात्र, पैसे भरूनही ड्रेसची डिलिव्हरी झाली नाही. आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी तीन अज्ञात मोबाईलधारकांसह संबंधित इन्स्टाग्राम आयडीविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
![]()


