नाशिकमधील ‘या’ खाद्य आस्थापनेचे FSSAI नोंदणी प्रमाणपत्र निलंबित; अस्वच्छ परिस्थितीत खाद्यपदार्थांची निर्मिती व साठवणूक

नाशिक। दि. १८ नोव्हेंबर २०२६: खाद्यपदार्थ तयार करताना आणि कच्च्या मालाची साठवणूक करताना अस्वच्छता आढळल्याने भद्रकाली मार्केट परिसरातील मे. सायंतारा साबुदाणा वडा व बटाटा कचोरी या खाद्य आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. या आस्थापनेचे FSSAI नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड यांच्या मार्गदर्शनाखाली १७ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित आस्थापनेची तपासणी करण्यात आली. यावेळी खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रक्रिया अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक परिस्थितीत सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच खाद्यपदार्थ आणि कच्च्या मालाची साठवणूकही अस्वच्छ पद्धतीने केली जात असल्याचे तपासणीत आढळले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे 21 नोव्हेंबर रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके

या अस्वच्छतेमुळे खाद्यपदार्थ दूषित होऊन ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी प्रशासनाने संबंधित आस्थापनेचे FSSAI नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील यांनी केली.

दरम्यान, सर्व खाद्य व्यावसायिकांनी खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता राखावी, कच्च्या मालाची व तयार खाद्यपदार्थांची योग्य आणि सुरक्षित साठवणूक करावी, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि त्याअंतर्गत लागू नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ २५ नोव्हेंबरला मॉक ड्रिल

खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी नाशिक विभागात खाद्य आस्थापनांची तपासणी व नियमानुसार कारवाईची मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.

खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता किंवा सुरक्षिततेबाबत संशय असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही प्रशासनाने कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790