
नाशिक। दि. १६ नोव्हेंबर २०२६ : नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत जुगाराच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट एकने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत १३ जणांना अटक केली असून, जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह एकूण ३ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू असताना गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संदीप भांड आणि उत्तम पवार यांना नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. संतोष गुदणे, भुऱ्या मामू ऊर्फ फिरोज, अश्पाक शेख, शब्बीर आणि हुसेन हे साथीदारांच्या मदतीने रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना जाळ्यात ओढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या टोळीकडून ‘तीन पत्ती’ आणि ‘काला-पिला’ या जुगारांच्या माध्यमातून पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले जात होते. मात्र, हातचलाखीचा वापर करून प्रवाशांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती तपासात समोर आली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमीज शेख यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी प्रवाशांच्या वेशात रेल्वेस्थानक, बसस्थानक तसेच परिसरातील हॉटेलमध्ये पाळत ठेवत सापळा रचला. जुगार सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकत १३ जणांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिकंदर अब्दुल सत्तार रेहमान (५६, घाटकोपर), इस्तेखार हकीमुद्दीन अन्सारी (६५, नालासोपारा), अफजल लियाकत खान (४३, शिवाजीनगर, मुंबई), रियाजुद्दीन अब्दुल कयुम मनियार (५२, अंधेरी), ओंकार चंद्रकांत महाडिक (३८, चिपळूण), सुनीलकुमार कालीप्रसाद चंद्रवंशी (४५, मालाड), रवी जगदीश शर्मा (५९, अहमदाबाद), मोहम्मद शाहिद मेहबूब आलम शेख (५९, मालाड), गुरुदत्त किशन यादव (२७, छत्रपती संभाजीनगर), आरिफ रमजान खान (५२, गोवंडी), राकेशकुमार सीताराम सिंह (५४, भाईंदर), कुंदनसिंग जब्बरसिंग राजपूत (५५, मुंबई) आणि प्रदीप सुभाष अग्रवाल (४३, ठाणे) यांचा समावेश आहे.
या सर्व आरोपींविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणूक आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट एककडून सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमीज शेख, किरण शिरसाठ तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
![]()


