सेवानिवृत्तीच्या अवघ्या दोन दिवस आधी आयुक्तांवर कारवाई; २० लाखांच्या बिलांसाठी लाच मागितल्याचा आरोप
नाशिक। दि. २९ ऑक्टोबर २०२६:* मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच मागितल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. कंत्राटदाराच्या दोन कामांची सुमारे २० लाख रुपयांची बिले मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप संबंधितांवर आहे. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
नाशिक एसीबीच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने छापा मारून मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचा स्वीय सहाय्यक निलेश पाटील आणि अकाउंटंट हरीश डिंगबर या तिघांनाही जागेवरच ताब्यात घेऊन अटक केली.
गवत काढण्याचे काम आणि जलवाहिनीशी संबंधित कंत्राटाच्या बिलांच्या मंजुरीसाठी लाचेची मागणी झाल्याची तक्रार विभागाला प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील कारवाई केली.
लाचेच्या मागणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेनंतर संबंधित आरोपींच्या घरांची झडती घेण्यासह अन्य तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराच्या कामांची बिले अदा करण्यासाठी लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या प्रकरणात महापालिका आयुक्तांसह तिघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, आयुक्त रवींद्र जाधव हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. सेवानिवृत्तीच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
![]()


