नाशिक: सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा- प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नाशिक। दि. १७ सप्टेंबर २०२६: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक ओळख देशासह जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी व्यापक व प्रभावी आराखडा तयार करावा, असे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिले.

महासंचालक श्री. सिंह यांच्या उपस्थितीत नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात माध्यम आराखड्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महासंचालकांचे विशेष कार्य अधिकारी इर्शाद बागवान, वृत्तचित्र विभागाचे वरीष्ठ सहायक संचालक सागरकुमार कांबळे आदी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्ध आईची हत्या; मद्यपी मुलाला अटक

महासंचालक श्री. सिंह म्हणाले, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे १२ वर्षानंतर कुंभमेळा भरत आहे. या कुंभमेळ्याचे जागतिक स्तरावर प्रभावी ब्रँडिंग करण्यासाठी पारंपरिक माध्यमांसोबतच डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे, दृक्-श्राव्य माध्यमे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध माध्यमांचा समन्वयित वापर करावा. त्यासाठी व्यापक आणि सर्वंकष असा आराखडा तयार करावा. या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये, धार्मिक परंपरा, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, गोदावरी नदी आणि प्रमुख तीर्थस्थळांची माहिती देश-विदेशातील भाविक व पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात यावी.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने व्यावसायिकाची ४५ लाख ५० हजारांची फसवणूक

कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्याबरोबरच अध्यात्मिक ठिकाणे, स्थानिक कला, संस्कृती, खाद्यपरंपरा, वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांचे प्रभावी सादरीकरण करण्यावरही भर द्यावा. त्यासाठी विविध माध्यमांसाठी स्वतंत्र आशय निर्मिती, साहित्य आणि सोशल मीडिया मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करावे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात सुरू असलेल्या दीर्घकालिन विविध पायाभूत सोयीसुविधांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी. चुकीच्या बाबी, अफवांचे तातडीने खंडन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. कुंभमेळा आयुक्त श्री. सिंह यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या १८ वर्षीय तरुणाला अटक

बैठकीनंतर महासंचालक श्री. सिंह यांनी रामकुंड परिसराला भेट देत पाहणी केली. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भाविकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा, प्रमुख स्थळांचे माध्यमीय सादरीकरण आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची त्यांनी माहिती घेतली.

यावेळी पोलिस आयुक्त श्री. कर्णिक, संचालक डॉ. गांगुर्डे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त श्री. रणदिवे, उपसंचालक डॉ. मोघे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790