नाशिक: घरफोड्या करून कारमध्येच मुक्काम; मुंबईच्या टोळीला नाशिक पोलिसांकडून अटक

नाशिक। दि. १४ सप्टेंबर २०२६: शहरासह परिसरात दिवस-रात्र घरफोड्या करून पोलिसांची नजर चुकविण्यासाठी कारमध्येच मुक्काम करणाऱ्या मुंबईतील चार सराईत चोरट्यांच्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी सुमारे २४ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि २०० ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली आहे.

जेलरोड परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना नाशिकरोड युनिटच्या पथकाला या टोळीचा माग काढण्यात यश आले. उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगल जगताप, अविनाश देवरे, राकेश राऊत आणि विजयकुमार सूर्यवंशी यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी; घाटमाथ्यावर आज ‘यलो अलर्ट’

सीसीटीव्हीच्या आधारे माग काढला:
घरफोडीच्या घटनेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासताना एका कारसह दुचाकी संशयास्पदरीत्या परिसरातील गल्ल्यांमध्ये फिरताना आढळली. वाहन क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली असता संबंधित वाहन मानखुर्द परिसरात असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी संशयित संजय रत्नेश कांबळे उर्फ सलीम अब्दुल लतीफ शेख याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लोखंडी पाइपला दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू

साथीदारांना बोलावून घेतले:
पोलिसांनी संशयिताच्या मदतीने त्याच्या साथीदारांशी संपर्क साधला. त्यानंतर आडगाव ट्रक टर्मिनल परिसरात सापळा रचून विनोद अशोक पवार (रा. कुलाबा) आणि तौसिफ इकबाल गोरमे (रा. मुरुड) यांना ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान नाशिक शहर व परिसरात केलेल्या घरफोड्यांमधून मिळविलेले चोरीचे सोने मुंबई, मानखुर्द आणि विरार परिसरात विक्री केल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिल्याचे समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  ई-प्रमाण सेवेमुळे दस्तांची प्रमाणित प्रत मिळणार ऑनलाइनडिजिटल सेवेमुळे वेळ, श्रम व खर्चात बचत; २४ तास सेवा उपलब्ध

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कारमध्येच झोप:
या टोळीने घरफोड्यांसाठी वेगळी पद्धत अवलंबल्याचे तपासात निष्पन्न झाले. दिवस असो वा रात्र, घरफोडी केल्यानंतर संशयित पोलिसांना आपला माग लागू नये यासाठी हॉटेल किंवा अन्य ठिकाणी न थांबता कारमध्येच झोपत असत. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते.

या कारवाईमुळे नाशिकरोड पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, टोळीशी संबंधित आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790