नाशिक: डुबेरे-सोनारी ते भगूर रस्त्यासह समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी ३४३.९९ कोटींची प्रशासकीय मान्यता

नाशिक। दि. १२ सप्टेंबर २०२६: आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सिन्नर तालुक्यातील डुबेरे-सोनारी- सोनांबे-शिवडे-पांढुर्ली-विंचूर दळवी ते भगूर रस्ता, कि.मी. १३/६०० ते २२/९००, प्र.जि.मा.-२६ तसेच बोरखिंड येथे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या इंटरचेंजच्या कामासाठी रु. ३४३ कोटी ९९ लाख इतक्या अंदाजित खर्चास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत नाशिककडे येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डुबेरे-सोनारी परिसरातून भगूर तसेच समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी उपलब्ध झाल्याने भाविकांच्या वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास, प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास आणि कुंभमेळ्याच्या वाहतूक नियोजनाला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीतील नाव दुरुस्ती, वगळणीसाठी शनिवार, रविवारी विशेष मोहीमेचे आयोजन

प्रस्तावित कामामध्ये मातीकाम, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण व काँक्रीट रस्ता यांचा समावेश आहे. तसेच चार नवीन मोठ्या पुलांचे, चार लहान पुलांचे, पोहोचमार्गांचे, सात वाहतूक भुयारी मार्गांचे, पाच नवीन बॉक्स कल्व्हर्टचे आणि दोन नवीन पाइप कल्व्हर्टचे बांधकाम करण्यात येणार आहे. या सुविधांमुळे कुंभमेळ्यात भाविकांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यास मोठी मदत होणार आहे.
याशिवाय संरक्षक भिंती, वृक्षलागवड, पेव्हर ब्लॉक, बसथांबा, सेवा वाहिन्यांचे स्थलांतरण, भूसंपादन, सौंदर्यीकरण, आरसीसी व कच्चे गटर्स, मुरूम बाजूपट्टी तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मार्गावरील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होऊन कुंभमेळ्यासाठी आवश्यक वाहतूक व नागरिक सुविधा उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 25 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

कामास तांत्रिक मंजुरी देण्यापूर्वी आवश्यक वन व पर्यावरणविषयक परवानग्या, भूसंपादन, वाहतूक अडथळ्यांबाबतची खातरजमा तसेच पूल व उड्डाणपुलांच्या आखणीस सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे इतर आवश्यक बाबींची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंजूर निधीच्या मर्यादेतच कामाचा खर्च राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  ई-प्रमाण सेवेमुळे दस्तांची प्रमाणित प्रत मिळणार ऑनलाइनडिजिटल सेवेमुळे वेळ, श्रम व खर्चात बचत; २४ तास सेवा उपलब्ध

सिंहस्थ कुंभमेळ्याची निकड लक्षात घेऊन या कामाच्या निविदा प्रक्रियेबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790